मुंबई: कोकणातील शेतकर्‍यांच्या व बागायतदारांच्या समस्या मला काही अंशी माहित आहेत. सध्या कोकणावर सातत्याने संकट येत आहेत. याबाबत आपण लवकरच पणन सहकार मंत्री, कृषी मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत, रत्नागिरी पालकमंत्री ना. अनिल परब व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या उपस्थितीत कोकणातील बागायतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणार असल्याचे आश्‍वासन खा. शरद पवार यांनी दिले आहे. मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काल दि. ५ मार्च रोजी खासदार शरद पवार यांचे उपस्थितीत आमदार शेखर निकम व आंबा, काजू, फणस बागायतदार यांची बैठक आयोजित केली होती. आमदार शेखर निकम यांनी शरद पवार यांची भेट घेवून कोकणातील आंबा, काजू, फणस, कोकम आदी बागायतदारांच्या समस्या कोकणातील सद्याची स्थिती याबाबतची माहिती खा. पवार यांनी घेतली व याचा सारासार विचार करून लवकरच कोकणातील बागायतदारांच्या प्रश्‍नाबाबत बैठक घेतली जाईल असे आश्‍वासन खा. पवार यांनी दिले. या बैठकीला आमदार शेखर निकम व माजी जिल्हा अध्यक्ष कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, राजन सुर्वे, तसेच आंबा बागायतदार प्रकाश साळवी, सुरेंद्र देवळेकर, सुभाष सरये, यशवंत मयेकर, मिलिंद खानविलकर, तसेच फणस व काजू व्यापारी मिथिलेश देसाई आदी उपस्थित होते.