रत्नागिरी : जिल्ह्यात वारंवार लागू करण्यात येणाऱ्या जमावबंदीच्या आदेशांविरोधात आवाज उठवणारे ॲड. महेंद्र वसंत मांडवकर यांच्या लढ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) रत्नागिरी तालुकाध्यक्ष ॲड. बंटी सदानंद वणजू यांनी ठाम पाठिंबा जाहीर केला आहे.
जिल्ह्यात वर्षभर सातत्याने लागू होणाऱ्या जमावबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संस्था, धार्मिक मंडळे, व्यापारी, युवक संघटना आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात एक आदेश संपण्यापूर्वीच दुसरा आदेश लागू होत असल्याने नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि शांततामय मार्गाने एकत्र येण्याच्या घटनात्मक अधिकारावर मर्यादा येत असल्याची चिंता ॲड. वणजू यांनी व्यक्त केली. कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असली, तरी त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात सरसकट निर्बंध लादणे योग्य नाही.
ज्या ठिकाणी प्रत्यक्ष कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, तेथेच आवश्यक तेवढे निर्बंध लागू करावेत; मात्र सामान्य नागरिकांच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व लोकशाही उपक्रमांवर विनाकारण बंधने येऊ नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
जमावबंदीचा उद्देश जनतेचे संरक्षण असावा, जनतेचा आवाज दाबणे नव्हे, अशी ठाम भूमिका मांडत ॲड. वणजू यांनी ॲड. महेंद्र मांडवकर यांच्या पुढाकाराचे स्वागत केले आणि त्यांच्या या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
रत्नागिरीतील नागरिकांना आपल्या समस्या संविधानिक मार्गाने मांडता याव्यात, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडावेत आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, यासाठी प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Leave a Reply