मुंबई : टीव्ही आणि डिजिटल पत्रकारांच्या हितासाठी व कल्याणासाठी कार्यरत असलेल्या टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनने (टीव्हीजेए) आपली सामाजिक बांधिलकी जपत राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री दुष्काळ निवारण निधीस एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या उपस्थितीत मंगळवारी या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या उपक्रमासाठी संस्थेने दाखवलेल्या संवेदनशीलतेचे आणि सामाजिक दायित्वाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक केले.
दिवाळीच्या निमित्ताने गरजू आणि दुष्काळग्रस्त लोकांच्या जीवनातही आनंदाचा दीप प्रज्वलित करण्याच्या उद्देशाने असोसिएशनने हा पुढाकार घेतला आहे.
राज्यातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सध्या विविध स्तरातून मदत केली जात आहे. प्रसारमाध्यमे आपल्या बातम्यांमधून दुष्काळाची भीषणता सातत्याने समोर आणत आहेत.
अशा परिस्थितीत टीव्ही आणि डिजिटल पत्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका जबाबदार संस्थेच्या नात्याने असोसिएशनने प्रत्यक्ष आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय घेतला.
या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव आणि कोषाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी आभार मानले.
पत्रकारिता ही केवळ समाजातील समस्या समोर आणण्यापुरती मर्यादित नसून, गरजेच्या वेळी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही देखील तिची महत्त्वाची जबाबदारी आहे, असा स्पष्ट संदेश या कृतीतून देण्यात आला आहे.
या मदतीमुळे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार असून, इतर सामाजिक आणि व्यावसायिक संघटनांनाही संकटकाळात मदतीसाठी पुढे येण्याची प्रेरणा मिळेल.

Leave a Reply