सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

पैशांच्या हव्यासापोटी अवघ्या २० दिवसांच्या बाळाचा साडेसहा लाखांत सौदा; मुंब्रा पोलिसांकडून २४ तासांत १० आरोपींना अटक, चिमुकल्याची सुखरूप सुटका

पैशांच्या हव्यासापोटी अवघ्या २० दिवसांच्या बाळाचा साडेसहा लाखांत सौदा; मुंब्रा पोलिसांकडून २४ तासांत १० आरोपींना अटक, चिमुकल्याची सुखरूप सुटका

रत्नागिरी : जगात येऊन अवघे २० दिवस झालेल्या आणि आईच्या कुशीत विसावलेल्या एका निष्पाप बाळाचा पैशांसाठी बाजार मांडल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.

मुंब्रा ते रत्नागिरी असा प्रवास करत, अडीच लाखांपासून सुरू झालेला या चिमुकल्याच्या विक्रीचा सौदा मध्यस्थांच्या साखळीतून तब्बल साडेसहा लाख रुपयांपर्यंत पोहोचला होता.

मात्र, मुंब्रा पोलिसांनी अत्यंत तत्परतेने सूत्रे हलवत अवघ्या २४ तासांत या अमानुष कृत्याचा पर्दाफाश केला. या धडक कारवाईत पोलिसांनी रत्नागिरीतून बाळाची सुखरूप सुटका केली असून, तीन पुरुष आणि सात महिला अशा एकूण दहा आरोपींना अटक केली आहे.

तसेच या प्रकरणात आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, एका निष्पाप जीवाच्या आयुष्याचा पैशांसाठी लिलाव करणाऱ्या या घटनेने माणुसकीलाच काळिमा फासला आहे.

कळवा येथील शांतीनगर परिसरात राहणारी एक १९ वर्षीय पीडित महिला मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करते.

तिच्या अवघ्या २० दिवसांच्या बाळाची विक्री करण्यासाठी रेहान रिजवान शेख याने तिच्यावर प्रचंड दबाव आणला होता. या बाळाचा सौदा सुरुवातीला अडीच लाख रुपयांना ठरविण्यात आला होता.

हा सर्व प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी पीडित महिलेला १ लाख ९५ हजार रुपये देण्यात आले.

मात्र, काही वेळाने संबंधित आरोपींनी पीडित महिला आणि तिच्या बहिणीला वायरने अमानुष मारहाण करून ती रक्कमही त्यांच्याकडून जबरदस्तीने हिरावून घेतली.

एका निष्पाप नवजात जीवाला त्याच्या जन्मदात्रीपासून दूर करण्यासोबतच पैशांच्या हव्यासापोटी महिलांना झालेल्या या अमानुष मारहाणीमुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले.

या गंभीर प्रकाराबाबत ५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी बाळाची तातडीने सुटका करण्याचे आणि सर्व आरोपींच्या अटकेचे आदेश दिले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी पाच स्वतंत्र पथके तयार केली.

पोलीस निरीक्षक वृषाली पवार, शरद कुंभार, प्रशांत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक तेजस सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक राम दळवी यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी तपासाला अत्यंत वेगाने गती दिली.

तपासादरम्यान बाळाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्याचे आणि प्रत्येक टप्प्यावर मध्यस्थांमुळे बाळाची किंमत वाढत ती साडेसहा लाखांवर गेल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले.

या प्रकरणातील गुन्हेगारांची मोठी साखळी लक्षात घेऊन पोलिसांनी ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी वेगाने कारवाई करत रेहान रिजवान शेख, फरहान ऊर्फ फरौ रेहान शेख, गोपीनाथ किसन धोत्रे या तीन पुरुष आरोपींसह अन्य सात संशयित महिला आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली.

यातील आरोपी गोपीनाथ धोत्रे याला एका पथकाने जालना येथून पकडले, तर दुसऱ्या पथकाने थेट रत्नागिरीपर्यंत धाव घेत बाळाचा शोध लावला.

सुटका करण्यात आलेल्या या नवजात बाळाची पोलिसांकडून तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, बालकल्याण समितीच्या निर्देशानुसार त्याला सध्या डोंबिवली येथील जननी आशीष संस्थेत अत्यंत सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहे.

बाळाच्या पुढील संगोपनाचा आणि भविष्याचा निर्णय समितीच्या आदेशानुसारच घेतला जाणार आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व दहा आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली.

या आंतरजिल्हा टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारे नवजात बालकांची खरेदी-विक्री केली आहे का, या रॅकेटमध्ये आणखी किती मध्यस्थ किंवा रुग्णालयातील कर्मचारी सहभागी आहेत, याचा अत्यंत सखोल तपास आता मुंब्रा पोलीस करत आहेत.

पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केला नसता तर या चिमुकल्याचे पुढे काय झाले असते, या प्रश्नाने सध्या संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे.

Baby Sold, Child Trafficking, crime news, Human Trafficking, Infant Rescued, Jalna, Maharashtra Crime, Mumbra Police, ratnagiri, Thane Police

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *