खेड : तालुक्यातील पोयनार येथे तब्बल २५ वर्षांपासून रखडलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. २६५ कोटी ४८ लाख रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर या प्रकल्पाचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन पार पडले.

या प्रकल्पामुळे पुढील दोन वर्षांत परिसरातील १४ गावांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला.

पोयनार धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता २७.८९९ दशलक्ष घनमीटर इतकी विस्तीर्ण असून यामुळे १४ गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून या प्रकल्पासाठी अखंड पाठपुरावा सुरू होता. पुढील दोन वर्षांच्या कालावधीत सर्व संबंधित गावांना प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देणे हेच प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले.

कोकणातील सिंचन क्रांतीचा उल्लेख करताना, मांडवे धरणासाठीही सुमारे २०० कोटींचा निधी मंजूर झाला असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतील रखडलेले सर्व जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

धरण बांधकामासोबतच प्रकल्पग्रस्तांच्या हिताची पूर्ण काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही कदम यांनी दिली. धरणाच्या बांधकामासोबतच बाधितांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया समांतरपणे राबवली जाईल.

कोणत्याही शेतकरी किंवा प्रकल्पग्रस्तावर अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

या भूमिपूजन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, माजी गृहमंत्री रामदास कदम, माजी आमदार संजय कदम यांच्यासह विविध क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.