रत्नागिरी : जिल्ह्यातील दुर्गम वाड्या-वस्त्यांपासून ते शहरांपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांचा एसटी प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

जिल्ह्यासाठी अत्याधुनिक अशा तब्बल १०४ नवीन बसेस एसटी महामंडळाच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. मध्यवर्ती बस स्थानकात आयोजित एका सोहळ्यात राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फित कापून या नूतन ‘जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना उदय सामंत यांनी सांगितले की, येत्या दोन महिन्यांत आणखी ४७ पर्यावरणपूरक ‘ई-शिवाई’ बसेस रस्त्यावर धावतील. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांच्यासह एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

प्रवाशांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेऊन यापूर्वी दापोली आगाराला ३५ बसेस देण्यात आल्या होत्या. त्यानंतर नव्याने आलेल्या ५० बसेससह आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०४ नवीन बसेस ताफ्यात रुजू झाल्या आहेत.

टप्प्याटप्प्याने रत्नागिरी विभागाला सुमारे ३०० ते ३२५ नवीन बसेस पुरवण्याचे एसटी महामंडळाचे उद्दिष्ट आहे. नव्या गाड्यांमुळे ग्रामीण भागातील बस फेऱ्या वेळेवर होऊन प्रवाशांची आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय कायमची दूर होणार आहे.

सध्या एसटी विभागीय कार्यालय परिसरात ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे काम युद्धपातळीवर सुरू असून, हे काम पूर्ण होताच पुढील दोन महिन्यांत ४७ ‘ई-शिवाई’ बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील.

या सोहळ्यादरम्यान उदय सामंत यांनी एसटी बससोबतच्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. राजकीय आणि सामाजिक प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात आपण याच लालपरीत बसून प्रवास केला आणि लोकांच्या अडीअडचणी समजून घेत जनतेशी नाळ घट्ट जोडली, असे ते म्हणाले.

नव्या बसेसचे लोकार्पण करताना या जुन्या दिवसांची आठवण ताजी झाल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमानंतर स्वतः नूतन जिजाऊ बसमध्ये बसून त्यांनी प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यानंतर विभागीय कार्यालयातील एसटी वर्कशॉपला भेट देऊन त्यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि गाड्यांची देखभाल, दुरुस्ती तसेच तांत्रिक सुविधांची सविस्तर पाहणी केली.