रत्नागिरी : ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा’ या विचारधारेवर आधारित कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलन २०२६ च्या निमित्ताने रत्नागिरीत ‘लेखक आपल्या भेटीला’ या विशेष साहित्यानुभवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता रत्नागिरी येथील फाटक हायस्कूलमध्ये पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून साहित्यिकांना थेट भेटण्याची आणि ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक, संवेदनशील लेखक व प्रभावी गीतकार प्रवीण दवणे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष, प्रसिद्ध लेखक, नाटककार व प्रभावी वक्ते प्रदीप ढवळ हे वाचकांच्या भेटीला येणार आहेत.
दि न्यू एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी यांच्या विशेष सहकार्याने कोकण मराठी साहित्य परिषदेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या साहित्यिक मेजवानीचा लाभ घेण्यासाठी शालेय विद्यार्थी, पालक आणि परिसरातील सर्व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

