Dapoli : गेली ४० वर्षे शेती, ग्रामविकास आणि सहकार क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत दापोली अर्बन बँकेचे विद्यमान संचालक माधव रामचंद्र ऊर्फ एम. आर. शेट्ये यांना अमेरिकेतील विद्यापीठातर्फे ग्रामविकास, शेती आणि सहकार या विषयात डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे.
हा पदवीदान समारंभ बुधवारी (२८ ऑक्टोबर २०२६) नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या समारंभाला ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनाईक, आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन तसेच विद्यापीठाचे कुलगुरू आणि संचालक उपस्थित होते.

या पदवीसोबतच जागतिक मानवाधिकार आयोगाच्या वतीने माधव शेट्ये यांना जागतिक मानवाधिकार संरक्षण समितीचे सभासदत्वही बहाल करण्यात आले आहे.
माधव शेट्ये यांनी २००१ ते २००३ या काळात दापोली तालुका रोजगार हमी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना ग्रामीण भागातील रस्ते आणि शेती सिंचनासाठी जव्हार विहिरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून ग्रामविकासाला मोठी गती दिली.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी २०२३ मध्ये दापोली ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या मंडणगड तालुक्यातील आंबवडेपर्यंत सुमारे साठ किलोमीटरची शेतकरी संवाद पदयात्रा काढली होती.
भात, नाचणी आणि वरी यांसारख्या पारंपरिक पिकांचा रोजगार हमी योजनेत समावेश केल्यास कोकणातील पिकांचे क्षेत्र आणि रोजगार वाढेल, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. याशिवाय प्रभाकर शिंदे यांच्यासोबत मिळून ‘कोकणातील नफ्याची शेती’ या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा आणि शेतीतील लोकशिक्षणाचा अभिनव प्रयोग राबवला.
याच कामाची दखल घेऊन त्यांना ही डॉक्टरेट जाहीर करण्यात आली. एक प्रगतिशील बागायतदार असलेल्या शेट्ये यांनी पुण्याच्या धुंडिराज पाठक यांच्याकडे वास्तू आणि वृक्ष यांचा विशेष अभ्यासही केला आहे.
सहकार आणि बँकिंग क्षेत्रातही माधव शेट्ये यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. दापोली अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक असलेल्या शेट्ये यांनी २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात भारत-श्रीलंका सहकार परिषदेत बँकेचे प्रतिनिधित्व केले होते.

त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या पुणे येथील प्रशिक्षण केंद्रातून कृषी बँकिंगचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. वर्तमानपत्रांतून विविध विषयांवर विपुल लेखन करण्यासोबतच त्यांनी १०० पेक्षा अधिक सामाजिक, राजकीय आणि बँकिंग क्षेत्रातील कार्यक्रमांचे यशस्वी सूत्रसंचालन केले आहे.
त्यांच्या या प्रदीर्घ आणि संघर्षमय वाटचालीत त्यांना शरद पवार, चंद्रकांत मोकल, निशिकांत जोशी, सुनील तटकरे, जयवंत जालगावकर, वसंत मेहेंदळे, हरी नरके, विकास शेट्ये आणि प्रभाकर शिंदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे सिद्ध करत मिळवलेल्या या यशाबद्दल माधव शेट्ये यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

