रत्नागिरी : शहर परिसरात सुरू असलेल्या गस्तीदरम्यान शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुरुगवाडा दांडा फिशरीजच्या मागे असलेल्या वरचीवाडी परिसरात छापा टाकून गोवा बनावटीच्या दारूचा मोठा बेकायदेशीर साठा जप्त केला आहे.
या कारवाईत सुमारे २८ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका ६० वर्षीय इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे.
गुन्हे प्रकटीकरण पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, वरचीवाडी येथे एका व्यक्तीने बेकायदेशीरपणे विक्रीसाठी गोवा बनावटीच्या विविध ब्रँडची दारू स्वतःकडे बाळगल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या प्रकरणी प्रशांत शिवराम नागवेकर (वय ६०, रा. मुरुगवाडा, भैरी मंदिराच्या मागे, रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, हवालदार शांताराम झोरे, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर, कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रशांत नागवेकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९५१ च्या कलम ६५ (ई) अन्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
शहरात अशा प्रकारे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

