दापोली : कोकणातील वर्चस्व वादाचा सामना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांच्या साहित्य विश्वातील अतिशय गाजलेल्या ‘गारंबीचा बापू’ या व्यक्तिरेखेचा मागोवा घेणारा चित्रपट आता नव्या धाटणीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दापोलीच्या मातीशी नाळ जपणारा आणि तिथेच पुन्हा जन्म घेणारा हा चित्रपट असून, त्याचे शंभर टक्के चित्रीकरण दापोलीतच केले जात आहे. पेंडसे यांचे जन्मगाव असलेल्या मुर्डी तसेच आंजर्ले आणि आसूद परिसरामध्ये सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अंतिम टप्पा सुरू आहे.

सुप्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक या चित्रपटात ‘गारंबीचा बापू’ ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबत यतीन कार्येकर, जयवंत वाडकर, पूजा लागू आणि देवदत्त दातार हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन गुरुप्रसाद करत आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटामध्ये दापोली तालुक्यातील १९ स्थानिक कलाकारांना अभिनयाची संधी मिळाली आहे.

यामध्ये शशी पेंडसे, सचिन गद्रे, विराज जोशी, रमेश मांगले, विनायक बाळ, कपिल पेंडसे, सुनील करमरकर, संजय परांजपे, श्रीकर बापट, विनोद जाधव, जितेंद्र विधवांस आणि स्वरूपा जोशी बाळ या सर्व स्थानिक कलाकारांचा सहभाग आहे.

दापोलीचे निसर्गसौंदर्य आणि दमदार कथानक असलेला हा चित्रपट महाराष्ट्रभरात फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.