रत्नागिरी : तंत्रज्ञानाच्या मदतीने सायबर गुन्ह्यांचा छडा लावत रत्नागिरी सायबर पोलिसांनी ‘इन्व्हेस्टमेंट फ्रॉड’च्या एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.
तब्बल ११ लाख ३७ हजार रुपयांच्या या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात आरोपींनी एका पीडित महिला आणि तिच्या पतीशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला होता.
त्यानंतर त्यांना आयपीओ आणि ओटीसी ट्रेडिंगद्वारे अधिक परतावा मिळण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले.
आरोपींनी या दाम्पत्याशी वारंवार संपर्क साधून गुंतवणूक व ट्रेडिंगच्या बहाण्याने विविध बँक खात्यांमध्ये एकूण ११,३७,०१४ रुपये जमा करण्यास भाग पाडले होते.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहारांचा मागोवा आणि गोपनीय बातमीदारांच्या जाळ्याचा वापर करून तपासाला गती दिली.
या सखोल तपासात मनी ट्रेलमधील आरोपी दादासाहेब चौगुले (रा. सोलापूर) आणि ऑपरेटर तुषार चौधरी (रा. धाराशिव) यांचा सहभाग निष्पन्न झाला.
स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना रत्नागिरी येथे आणून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम आणि आदर्श इंगवले यांच्या पथकाने केली.
या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. शेअर मार्केट, ट्रेडिंग व ऑनलाइन गुंतवणुकीत कमी वेळेत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
अनोळखी व्यक्ती, बनावट ॲप्स, व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुप्सवर मिळणाऱ्या गुंतवणुकीच्या टिप्सवर विश्वास न ठेवता, कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी तिची सत्यता तपासून अधिकृत संस्थांमार्फतच गुंतवणूक करावी असे त्यांनी स्पष्ट केले.
जास्त परताव्याचे आमिष हा फसवणुकीचा इशारा असू शकतो, त्यामुळे कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी त्वरित १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

