रत्नागिरी: जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिनाचे औचित्य साधून १५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीतील दिव्यांगांसाठी कार्यरत असणाऱ्या आस्था सोशल फाउंडेशनतर्फे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे अंध दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्यात आला असून, त्यांच्यासाठी दर्जेदार शैक्षणिक साहित्य, विशेष शाळा, परीक्षेसाठी रीडर आणि रायटर पॅनल, रोजगाराच्या नवीन संधी आणि सर्वत्र सुगम्य परिसर उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी आस्था सोशल फाउंडेशनच्या सचिव सुरेखा पाथरे यांच्यासह अंध दिव्यांग यश देवरुखकर, मोहंमद गडकरी, मोहंमद गौस शेख आणि अनेक दिव्यांगांचे पालक प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी अंध दिव्यांगांच्या समस्या आणि दैनंदिन जीवनातील अडचणी सविस्तरपणे समजून घेतल्या. तसेच, प्रशासनाकडून या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून अंध दिव्यांगांना संपूर्ण सहकार्य दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

