Dapoli : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘माझी सुरक्षितता, माझा अधिकार – स्पर्शाची जाणीव आणि वैयक्तिक मर्यादा’ या विषयावर एका विशेष संवादात्मक सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्राला पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव आणि पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना योग्य व अयोग्य स्पर्श यांतील फरक, वैयक्तिक मर्यादा, स्वतःच्या शरीरावरील अधिकार आणि स्वतःची सुरक्षितता कशी जपावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी पोक्सो कायदा २०१२ अंतर्गत बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी असलेल्या विविध कायदेशीर तरतुदींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

कोणत्याही अनुचित प्रसंगात घाबरून न जाता आपल्या विश्वासू व्यक्तीशी संवाद साधणे, वेळेवर मदत मागणे आणि स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे किती महत्त्वाचे आहे, हे या सत्रात समजावून सांगण्यात आले.

या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुजय मेहता आणि शाळेच्या मुख्याध्यापिका रितू मेहता यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या अशा उपक्रमांना शाळेत नेहमीच प्राधान्य दिले जाते, असे यावेळी सांगण्यात आले.