दापोली: दशानेमा गुजर युवक संस्था, दापोली आणि कुमार फ्रेंड सर्कल स्पोर्ट्स, पालगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत डॉ. मोहन महादेव गुजर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पालगड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत पालगड बसस्थानकासमोरील कुमार फ्रेंड सर्कल स्पोर्ट्स येथे पार पडणार आहे. डॉ. मोहन महादेव गुजर हे दापोलीतील दशानेमा समाजातील एक ज्येष्ठ, अनुभवी आणि जाणकार डॉक्टर म्हणून परिचित होते.

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासोबतच त्यांना राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसाही लाभला होता. त्यांच्या कार्याच्या स्मृतींना उजाळा देत समाजोपयोगी उपक्रमातून त्यांना आदरांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने या आरोग्य तपासणी शिबिराला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

गतवर्षी फणसू प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पहिल्या शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर यावर्षी पालगडमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये विविध वैद्यकीय तज्ज्ञांकडून नागरिकांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.

यामध्ये जनरल सर्जन डॉ. कुणाल मेहता, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शेखर तलाठी, दंतचिकित्सक डॉ. वरुण मोदी, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सचिन गुजर आणि आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. समर्थ पेंढारे या डॉक्टरांचा समावेश आहे.

शिबिरानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असलेल्या रुग्णांना दापोली येथील डॉ. समीक्षा मेहता यांच्या निष्कर्ष सोनोग्राफी अँड डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी तपासणीवर २० टक्के विशेष सवलत देण्यात येणार आहे.

तसेच शिबिरात तपासणी करून डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर पालगड येथील कलावती मेडिकल स्टोअरमध्ये १० टक्के विशेष सवलत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेण्याची संधी मिळणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन दशानेमा गुजर युवक संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, कुमार फ्रेंड सर्कल स्पोर्ट्सचे अध्यक्ष अनंत बामणे आणि प्रकल्प समन्वयक सिद्धेश शेठ यांनी केले आहे.