दापोली : तथागत गौतम बुद्धांच्या धम्मविचारांचा प्रसार, सामाजिक एकता आणि संघटनात्मक बळकटीकरणाचा संदेश देणारा बौद्धजन सेवा संघ, मुंबई (तालुके दापोली-मंडणगड) अंतर्गत दापोली ‘ब’ केंद्राचा वर्षावास कार्यक्रम टाळसुरे येथील शाखा क्रमांक ५६ जेतवन बुद्ध विहार येथे उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

केंद्राध्यक्ष अनिल गुणाजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विविध केंद्रांचे पदाधिकारी, गावशाखांचे प्रतिनिधी, महिला मंडळे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भंते मिलिंद बोधी थेरो यांनी उपस्थित उपासक-उपासिकांना धम्मदेसना देत धम्माचरणाचे महत्त्व विशद केले.

बुद्धांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात बंधुभाव, समता, विवेक आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश त्यांनी दिला.

या सोहळ्याला मातृसंस्थेचे सभापती अनंत मोहिते, उपसभापती शरद जाधव, संघाध्यक्ष सुनील देवळेकर, उपाध्यक्ष विलास तांबे आणि सुरेश पवार, चिटणीस रूपेश कासारे, संघ कमिटी सदस्य रवींद्र मरचंडे, मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष भगवान घाडगे, उपाध्यक्ष निवास जाधव आणि मनोज मोरे, सदस्य हनुमान मोरे, राजाराम जाधव, मनोज रुके, अशोक जाधव, सचिव प्रितम रुके आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मनोहर तांबे आणि टाळसुरे शाखेचे अध्यक्ष अजित जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी मुंबई केंद्र कमिटीचे सहसचिव तुळशीराम तांबे, सदस्य संकेत जाधव आणि मोहन जाधव हेदेखील उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सभापती अनंत मोहिते यांनी दापोली ‘ब’ केंद्राने केलेल्या नियोजनाचे कौतुक केले व संघटनेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.

उपसभापती शरद जाधव यांनी हेवेदावे बाजूला ठेवून संस्थेचे काम नेटाने पुढे नेण्याची गरज व्यक्त केली, तर संघाध्यक्ष सुनील देवळेकर यांनी मुंबई आणि ग्रामीण असा भेदभाव न करता सर्वांनी मातृसंस्थेच्या छत्राखाली एकत्र येऊन काम करण्यावर भर दिला.

मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष भगवान घाडगे यांनी धम्माचरणासोबतच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संघटित प्रयत्नांचे महत्त्व विषद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल गुणाजी जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तरुण पिढीला संघटनेत काम करण्याची संधी देण्याची आवश्यकता बोलून दाखवली.

नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन देत अनुभवी आणि तरुण कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे संघटनेच्या विकासासाठी योगदान द्यावे, तसेच मतभेद विसरून सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्राचे पदाधिकारी, टाळसुरे-नारगोली शाखेचे पदाधिकारी, माता रमाबाई महिला मंडळ, मध्यवर्ती कमिटीचे माजी अध्यक्ष अशोक जाधव आणि तरुण कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

याप्रसंगी जोगळे, खेर्डी, मौजे दापोली, करंजाणी, महाळुंगे, पिसई, बोंडीवली, टाळसुरे, नारगोली, वाकवली, शिरशिंगे, गिम्हवणे, इनामपांगारी, बांधतिवरे आणि शिरदे येथील शाखा पदाधिकारी व सदस्यांची लक्षणीय उपस्थिती होती.