दापोली: विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल २२९-चंद्रनगर मतदान केंद्राचे बीएलओ बाबू घाडीगांवकर यांचा उत्कृष्ट बीएलओ म्हणून गौरव करण्यात आला आहे.
दापोलीतील आझाद मैदान येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत बाबू घाडीगांवकर यांनी दापोली तालुक्यातील २२९-चंद्रनगर मतदान केंद्रावर १०० टक्के मॅपिंग पूर्ण केले, तसेच संभाव्य सुनावणी संख्या शून्य राखण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली.
त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला. आझाद मैदान येथील ध्वजारोहण कार्यक्रमात दापोलीचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार सुर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, पंचायत समिती सभापती उन्मेष राजे, नगराध्यक्षा कृपा घाग, जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, नायब तहसीलदार समीर सावंत आणि गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन घाडीगांवकर यांना गौरविण्यात आले.
बीएलओ म्हणून पार पाडलेल्या या उत्कृष्ट जबाबदारीबद्दल बाबू घाडीगांवकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

