दापोली: दापोली शिवसेना शहरप्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ११ ऑगस्ट रोजी त्यांनी आपला राजीनामा शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आणि दापोली तालुकाप्रमुख उन्मेष राजे यांच्याकडे सुपूर्द केला.

दापोलीतील ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बस कर्मचाऱ्यांच्या ड्युटी नियोजनावरून उद्भवलेल्या वादानंतर एका कथित ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर सुरू होती.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाची शिस्त आणि संघटनात्मक हित विचारात घेऊन रेळेकर यांनी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, ई-शिवाई इलेक्ट्रिक बस चालकांच्या ड्युटी नियोजनाच्या मुद्द्यावरून संबंधित कर्मचारी आणि एका पदाधिकाऱ्यामध्ये वाद निर्माण झाला होता.

या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर स्थानिक राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते.

या संपूर्ण वादानंतर पक्षांतर्गत पातळीवर वेगाने घडामोडी घडल्या आणि अखेर रेळेकर यांच्या राजीनाम्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

रेळेकर यांच्या राजीनाम्यानंतर आता दापोली शिवसेनेत नवीन शहरप्रमुखाच्या नियुक्तीसाठी पक्षांतर्गत हालचालींना मोठा वेग आला आहे.

नव्या नेतृत्वाची निवड करण्यासाठी स्थानिक पातळीवर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून, काही संभाव्य नावांवर गांभीर्याने विचार सुरू आहे.

आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करू शकेल अशा पदाधिकाऱ्याकडे शहरप्रमुख पदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. नवीन शहरप्रमुखाच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच पक्षाकडून केली जाणार असल्याचे समजते.

Tags:

Dapoli Shiv Sena, Prasad Relekar, Shiv Sena Resignation, Dapoli Politics, E Shivai Bus Dispute, Ratnagiri Politics, Yogesh Kadam, Maharashtra Politics