Ratnagiri : हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषात ही रॅली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली होती.
सकाळी १० वाजता मारुती मंदिर येथून या रॅलीला सुरुवात झाली. सावरकर चौकामार्गे मार्गक्रमण करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला.

रॅलीत सहभागी झालेल्या दुचाकींवर लावलेले राष्ट्रध्वज आणि नागरिकांच्या हातातील तिरंग्यामुळे रत्नागिरी शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते.
या रॅलीत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नागरिकांमधील प्रचंड उत्साह आणि शिस्तबद्धतेमुळे ही रॅली अधिकच दिमाखदार ठरली.
या भव्य तिरंगा बाईक रॅलीत महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, रॅलीचे संयोजक संतोष सावंत, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळवी, युवा मोर्चा शहराध्यक्ष अजिंक्य केसरकर, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, उपाध्यक्ष राजू भाटलेकर, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि मंदार खंडकर यांच्यासह अनेक नगरसेवक, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक असून, हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
रत्नागिरीकरांनी या रॅलीला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद शहरातील राष्ट्रभक्तीची ताकद दर्शवणारा आहे. तिरंग्याचा सन्मान आणि राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव जागृत राहावी, हाच या रॅलीचा मुख्य उद्देश असल्याचे शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ काढण्यात आलेली ही रॅली देशभक्तीच्या जयघोषात यशस्वीपणे संपन्न झाली.

