मुंबई: नागरिकांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळखोरांवर आता थेट संघटित गुन्हेगारी म्हणजेच ‘मकोका’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

अन्न आणि दुधात भेसळ करणे हा केवळ साधा गुन्हा नसून तो नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याने अशा समाजकंटकांवर कोणतीही नरमाई न दाखवता अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचे कडक निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

सह्याद्री अतिथीगृह येथे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ अंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी विविध विभागांचे टप्पे आणि कार्यवाही निश्चित करण्यासाठी आयोजित बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणावेळी त्यांनी या सूचना केल्या.

लहान मुले मोठ्या प्रमाणावर दूध पितात, त्यामुळे बनावट पनीर आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या सेवनाने त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर आजारांचा सामना करावा लागू शकतो, ही बाब गांभीर्याने घेत एकनाथ शिंदे यांनी भेसळखोरांवर जरब बसवण्याची आवश्यकता व्यक्त केली.

या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी आणि न्यायालयात खटले सुरू असताना गुन्हेगारांना कोणतीही कायदेशीर पळवाट किंवा त्रुटी मिळू नये, यासाठी नामवंत आणि ज्येष्ठ विधितज्ज्ञांची मदत घेऊन तातडीने एक विशेष लीगल टीम तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

या महत्त्वाच्या बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधि व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, विधि व न्याय विभागाचे सचिव उदय शुक्ला आणि अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.