दापोली : येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयातील कृषी विस्तार शिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत हरित सेना वर्धापन दिन आणि नशामुक्त युवा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आपली पृथ्वी पुढच्या पिढीकडे सोपविताना ती अधिक चांगली, स्वच्छ आणि सुरक्षित राहावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असून, त्यासाठी हरितसैनिक म्हणून तरुणांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक संजयकुमार तोरणे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीबाबत मार्गदर्शन केले.

क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रम संचालक अरुण माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुस्तकी ज्ञानापेक्षा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रत्यक्ष अनुभव घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले.

अशा उपक्रमांमुळे विचारसरणीत सकारात्मक बदल घडून येतो, असे सांगत विकसित भारत घडविण्यासाठी तरुणांनी प्रथम स्वतःमध्ये बदल घडवावा आणि त्यानंतर समाजातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

विस्तार शिक्षण प्रमुख संतोष वरवडेकर यांनी हरित सेनेच्या स्थापनेपासून आतापर्यंत गावागावांत राबविण्यात आलेल्या पर्यावरण संवर्धन, जनजागृती आणि सामाजिक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेऊन हरित सेनेच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमाची सुरुवात सहायक नियंत्रक अपर्णा जोईस यांनी गायलेल्या वंदे मातरमने झाली. त्यानंतर त्यांनी पक्षी निरीक्षणातील बारकावे व अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. फळशास्त्र विभाग प्रमुख प्रफुल्ल माळी यांनी हवामान बदल व शाश्वत शेती याविषयी मार्गदर्शन करताना शेतीमध्ये इंधनाचा कमीत कमी वापर करण्याचे आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान हरितमित्र संजुला भवर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत आपले अनुभव कथन केले. पशुसंवर्धन विभाग प्रमुख नरेंद्र प्रसादे, मृद व जलसंधारण विभाग प्रमुख बजरंग आयरे आणि ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या विद्या तसेच दीक्षा यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. यानंतर नरेंद्र प्रसादे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी नशा न करण्याची शपथ घेतली.

यावेळी सिद्धेश पाटील, सक्षम जगदाळे, भाविका पाटील आणि शौनक घाग या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन वागळे यांनी केले, सूत्रसंचालन मृणाली इंगवले आणि मानसी गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिहीर पाटील याने केले.

संतोष वरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे आणि हरित सेनेचे सर्व विद्यार्थी व स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाला आशिष शिगवण, रणजित महाडिक, सुमेध थोरात, शिल्पा नाईक, नितीन वागळे, श्रीयश पवार आणि विशाल बोरघरे हे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.