दापोली : वाकडा आंबा ते आडे दरम्यान जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एक भीषण अपघात घडला असून मालवाहू डंपर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाला आहे.

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. डंपर पलटी झाल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक किरकोळ जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम हाती घेतले आणि वाहतूक पूर्ववत केली.

या मार्गावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे आणि रस्त्याच्या अवस्थेमुळे चालकांना कसरत करावी लागत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.