दापोली : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून “ज्ञानाच्या दारी : विठू माऊलीची वारी” हा सांस्कृतिक व भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन सुजय मेहता, राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा व नगरसेविका साधना बोत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस प्रिती जैन, एस.एम.सी. सदस्य नेहा मेहता, मीनल मेहता आणि मुख्याध्यापिका रितू मेहता उपस्थित होत्या.

सुजय मेहता यांच्या हस्ते पादुका पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शाळा परिसरातून पारंपरिक दिंडी सोहळा काढण्यात आला, ज्यामध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकाराम व जय हरी विठ्ठल यांच्या नामघोषात विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सहभाग नोंदवला.

दिंडीदरम्यान पारंपरिक रिंगण सोहळा पार पडला. यानंतर विठ्ठल-रुक्मिणीची पूजा व आरती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंगगायनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

वारकरी परंपरेचे महत्त्व आणि संतांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित केलेला हा उपक्रम यशस्वी ठरला.

या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापिका रितू मेहता, शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे कौतुक करण्यात आले.