दापोली : शहरातील वाढती अस्वच्छता आणि उघड्यावर कचरा टाकण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी दापोली युथ अलायन्स आणि दापोली नगरपंचायत यांनी संयुक्तपणे पावले उचलली आहेत.

शहरात विविध ठिकाणी ‘येथे कचरा टाकू नये’ असे चेतावणी देणारे फलक लावून सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे.

दापोली शहरातील अनेक प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि कचरा साचण्याच्या संभाव्य जागांवर उघड्यावर कचरा टाकला जात असल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत होता, तसेच परिसराचे सौंदर्यही बिघडत होते.

यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी युथ अलायन्सच्या तरुणांनी नगरपंचायतीच्या सहकार्याने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

लाभालेल्या या फलकांवर येथे कचरा टाकताना आढळल्यास कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत दापोली युथ अलायन्सच्या सदस्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून फलक उभारणी केली असून, नागरिकांना कचरा उघड्यावर न टाकता नगरपंचायतीच्या घंटागाडीत किंवा योग्य कचराकुंडीतच टाकण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासन आणि युवकांच्या या संयुक्त मोहिमेचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत केले जात असून, या उपक्रमामुळे दापोली शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.