दापोली : रामराजे महाविद्यालय आणि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त दापोली शहरामध्ये विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

या अभियानादरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करत नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती केली.

या सामाजिक उपक्रमाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छता अभियानानंतर महाविद्यालयात ‘बँकिंग व सहकार क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (RDC Bank) दापोली उपव्यवस्थापक स्वप्नाली कालेकर उपस्थित होत्या.

त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना बँकिंग व सहकार क्षेत्रातील विविध संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि या क्षेत्रातील भविष्यातील आव्हाने व फायदे याबद्दल सविस्तर व मार्गदर्शनपर माहिती दिली.

या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक संदीप राजपुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वेदिका राणे, प्रा. कुणाल मंडलिक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष येसावरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. अंकिता दळवी, प्रा. प्रीती सकपाळ, प्रा. स्मिता बैकर व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता बैकर यांनी केले.