दापोली : येथे मैत्री ग्रुप दापोली आयोजित मैत्री चषक स्पर्धा यावर्षी अत्यंत उत्साहात आणि भव्य वातावरणात संपन्न झाली. क्रीडारसिकांच्या उदंड प्रतिसादात पार पडलेल्या या स्पर्धेत सिया स्पोर्ट्स दापोली संघाने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत प्रथम पारितोषिक पटकावले.

तर अतुल भाटी यांच्या संघाने द्वितीय पारितोषिक मिळवून उपविजेतेपद मिळवले. स्पर्धेत खेळाडूंनी दाखवलेल्या कौशल्याचे कौतुक करण्यासाठी विविध वैयक्तिक पुरस्कारही देण्यात आले.

यामध्ये आयुष याने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ‘उगवता तारा’ आणि ‘उत्कृष्ट गोलंदाज’ हे दोन्ही बहुमान पटकावले. संपूर्ण स्पर्धेत छाप पाडणाऱ्या अक्षय निवाते याला ‘मॅन ऑफ द सीरिज’ या किताबाने गौरविण्यात आले, तर जयश्वर याने ‘उत्कृष्ट फलंदाज’ आणि उद्देश याने ‘उत्कृष्ट क्षेत्ररक्षक’ म्हणून आपली छाप पाडली.

यावर्षीच्या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच संघांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मैत्री ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आणि चोख नियोजन करत ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली.