रत्नागिरी : १० जुलै रोजी असलेल्या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या वतीने पटवर्धन हायस्कूल येथे ‘मत्स्य शेतीतील रोजगार संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यातील यशस्वी कोळंबी संवर्धक आणि मत्स्य अभियांत्रिकी पदविकाधारक श्रद्धा अनगोळकर कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
श्रद्धा अनगोळकर यांनी राजापूर आणि दापोली तालुक्यात कोळंबी शेती फार्म तयार केले असून त्या अत्यंत यशस्वीपणे कोळंबीचे उत्पादन घेत आहेत. वर्षातून दोन वेळा निर्यातक्षम कोळंबीचे पीक घेत त्यांनी स्वतःचा स्वरोजगार तर उभा केलाच आहे, शिवाय परिसरातील अनेक लोकांसाठी रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण केल्या आहेत.

या मार्गदर्शन शिबिरात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे सुशील कांबळे यांनी मत्स्य शेतीतील रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींविषयी, तर प्रतीक यादव यांनी कोळंबी संवर्धनातील रोजगाराच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
नैसर्गिक जलस्रोतातील मत्स्यसाठा वाढते प्रदूषण आणि अनियंत्रित मासेमारीमुळे हळूहळू कमी होत असल्याने, मत्स्य शेती करून मत्स्य उत्पादन वाढवणे सहज शक्य असल्याचे इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनच्या अध्यक्षा सुवर्णा चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले.
मत्स्य व्यवसायामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगारातून मोठ्या संधी उपलब्ध असून, तरुण आणि विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात स्वतःचे करिअर करावे आणि शासनातर्फे उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला इनर व्हील क्लबच्या माजी अध्यक्षा ऋचा गांधी, श्रद्धा सावंत, प्रियांका कांबळे, आशा सनगर, अपूर्वा सुर्वे आणि अनुश्री सावंत आवर्जून उपस्थित होत्या. पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका घाटविलकर यांच्या मोलाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
शालेय जीवनातच करिअरविषयक महत्त्वाचे मार्गदर्शन मिळाल्याने उपस्थित विद्यार्थ्यांनी या शिबिराबद्दल मोठे समाधान व्यक्त केले.

