दापोली : तालुक्यात ४ ते ७ जुलै २०२६ या अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत पोक्सो कायद्यांतर्गत तीन गंभीर गुन्हे घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निवेदिता प्रतिष्ठान आणि दापोलीतील नागरिकांनी तहसीलदार कार्यालयावर धडक देत सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करणारे निवेदन १० जुलै रोजी सादर केले.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या या घटना दापोलीसारख्या सुसंस्कृत तालुक्यासाठी अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाण्या असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
एका अल्पवयीन मुलीला मातृत्वास भाग पाडणाऱ्या आरोपीला थेट फाशीची शिक्षा द्यावी, तसेच सर्व आरोपींवर कडक कारवाई करून भविष्यात अशा विकृत प्रवृत्तींवर वचक निर्माण करावा, अशी आक्रमक मागणी नागरिकांनी केली आहे.
याशिवाय सर्व आरोपींना जाहीररीत्या चाबकाचे फटके मारावेत, अशी संतप्त भावनाही व्यक्त करण्यात आली. डिसेंबर २०२५ मध्ये एका दिव्यांग युवतीवर ७२ वर्षीय वृद्धाने केलेल्या अत्याचार प्रकरणात अटक असलेल्या आरोपीलाही फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडित युवतीला शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ तातडीने मिळावा, याकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे.
हे निवेदन स्वीकारताना तहसीलदारांनी दापोलीत सलग घडलेल्या या घटनांबाबत खंत व्यक्त करत नागरिकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे, समन्वयक स्कंधा खेडेकर, दापोली तालुका व्यापारी संघटनेचे सचिव मिलिंद शेठ, कुणाल मंडलिक, आनंद दांडेकर, मुग्धा सरदेसाई, श्रद्धा दांडेकर, वैष्णवी भागवत आणि महाविद्यालयीन प्रतिनिधी नेहल पवार यांनी मनोगत व्यक्त करून कठोर शिक्षेची मागणी केली.
याप्रसंगी दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेचे पत्रकार आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

