दापोली : येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड यांची पंजाबमधील कपूरथला येथील सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्थेच्या महासंचालकपदी आगामी तीन वर्षांसाठी निवड झाली आहे.
अशा अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमध्ये महासंचालकपदी निवड झाल्याने कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी डॉ. अतुल मोहोड यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्था ही भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली कार्यरत असणारी एक अत्यंत नामांकित संस्था आहे.
ही संस्था देशपातळीवर जैव इंधनासंबंधित संशोधन, शिक्षण आणि विस्तार, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जैव ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांसोबत सामंजस्य कराराच्या माध्यमातून मोठे कार्य करते.
अशा महत्त्वपूर्ण संस्थेच्या सर्वोच्चपदी विद्यापीठातील एका अनुभवी शास्त्रज्ञाची निवड झाल्याबद्दल विद्यापीठ परिसरात आणि दापोलीत सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. अतुल मोहोड यांना कृषी विद्यापीठामध्ये गेली पंचवीस वर्षे अपारंपरिक ऊर्जा स्रोत विभागात सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभागप्रमुख ते सहयोगी अधिष्ठाता अशा विविध पदांवर काम केल्याचा दांडगा प्रशासकीय आणि संशोधनाचा अनुभव आहे.
याशिवाय त्यांनी विद्यापीठ अभियंता म्हणूनही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. त्यांच्या पुढाकाराने दापोली येथे उभारण्यात आलेले एनर्जी पार्क, गॅसिफायर, कोकणातील शेतमालापासून मिळणारा काडीकचरा आणि जंगली झाडाझुडपांपासून जैविक कोळसा तयार करण्याचे तंत्रज्ञान, तसेच अपारंपरिक ऊर्जेच्या स्रोतांपासून विविध प्रकारची वाळवणी यंत्रे विकसित करण्याच्या संशोधनात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
या गौरवशाली निवडीबद्दल विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने नुकतेच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

