रत्नागिरी : कोकण आणि विशेषतः रत्नागिरीच्या दळणवळण तसेच सुरक्षा क्षेत्राच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल पडत आहे. रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात ५ जुलै रोजी रविवारी ऐतिहासिक सामंजस्य करार होणार आहे.
हा सोहळा सकाळी ११ वाजता रत्नागिरीतील टी.आर.पी. परिसरातील हॉटेल सावंत पॅलेस हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यांच्यासोबत मंत्री योगेश कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
याव्यतिरिक्त खासदार नारायण राणे, सुनील तटकरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, शेखर निकम, भास्कर जाधव आणि किरण सामंत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, कमांडिंग ऑफिसर कुणाल नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची उपस्थिती असेल.
विमानतळाच्या या सामंजस्य करारामुळे केवळ नागरी विमान वाहतुकीलाच नव्हे, तर किनारपट्टीच्या सुरक्षेला आणि स्थानिक पर्यटनाला देखील मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी यांनी केले आहे.


