चिपळूण: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूणच्या अमृत महोत्सवानिमित्त २६ ते २८ जून २०२६ या कालावधीत रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गटांमधून सुमारे २५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या स्पर्धेत रत्नागिरीच्या राष्ट्रीय खेळाडू अभिषेक चव्हाणने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दुहेरी मुकुट पटकावण्याची चमकदार कामगिरी केली आहे.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अभिषेक चव्हाण याने देवरूखच्या राहुल भस्मे या राष्ट्रीय खेळाडूवर २३-०९, २५-०० अशा सरळ दोन सेटमध्ये सहज मात करून २०२६-२७ या वर्षातील जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तत्पूर्वी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यांमध्ये अभिषेक चव्हाणने दीपक वाटेकरचा तर राहुल भस्मेने विजय कोंडविलकरचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या रियाज अकबर अली आणि अभिषेक चव्हाण या जोडीने चिपळूणच्या अभिजित खेडेकर आणि दीपक वाटेकर या जोडीचा ००-१६, ११-००, १३-१० असा अटीतटीच्या सामन्यात पराभव करून विजेतेपदावर मोहोर उमटवली. या गटाच्या उपांत्य फेरीत अभिषेक आणि रियाझ जोडीने मनोज सप्रे आणि महेश शेट्ये जोडीवर तर दीपक आणि अभिजित जोडीने राहुल भस्मे आणि मुक्तानंद वरवडेकर जोडीवर विजय मिळवला होता.
पुरुष वयस्कर गटात देवरूखच्या राहुल भस्मेने राष्ट्रीय खेळाडू संतोष जोगळेकर यांचा २५-०४, २५-०१ असा एकतर्फी पराभव करत विजेतेपद मिळवले. या गटातील उपांत्य सामन्यात संतोष जोगळेकरने दामोदर घाणेकरचा तर राहुल भस्मेने गणेश पाटणकरचा पराभव केला होता. महिला गटात आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा कदम हिने राजापूरच्या निधी सप्रे हिचा २५-००, ०४-१९, १६-०० असा संघर्षपूर्ण सामन्यात पराभव करून महिला गटाचे विजेतेपद पटकाविले. या गटाच्या उपांत्य फेरीत आकांक्षाने स्वर मोहिरे हिचा आणि निधीने स्वरा कदम हिचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.
किशोर गटात (१४ वर्षाखालील मुले) लांजाच्या आदित्य देसाईने गुहागरच्या हर्ष कदम याचा २५-०६, २५-०६ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. या गटाच्या उपांत्य फेरीत आदित्यने शर्विल पावसकर तर हर्षने रुद्र मेहेंदळे याला पराभूत केले होते. कुमार गटात (१८ वर्षाखालील मुले) रत्नागिरीच्या ओम पारकरने गुहागरच्या आर्यन राऊत याचा १३-१५, २४-०३, २१-०२ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. उपांत्य फेरीत ओमने स्मित कदमला आणि आर्यनने वेदांत करंगुटकरला नमवले होते.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, अष्टगंध डेव्हलपर्सचे बळीराम मोरे, मंडळाचे कार्याध्यक्ष रमण डांगे, कार्यवाह प्रभंजन पिंपुटकर, कोषाध्यक्ष शेखर सावले, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, कार्यकारिणी सदस्य प्रदीप परचुरे व विवेक देसाई, तसेच सचिन बंदरकर, सागर कुलकर्णी, शैलेश वाघाटे, अजय खातू, मुक्तानंद वरवडेकर, दीपक वाटेकर, अभिजित खेडेकर यांसह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.

