रत्नागिरी : पावसाळ्यातील निसर्गाचे विलोभनीय रूप आणि मनसोक्त आनंदाचा अनुभव घेण्यासाठी माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘वर्षारंग २०२६’ या विशेष निसर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या १ आणि २ ऑगस्ट २०२६ रोजी हा दोन दिवसीय उपक्रम पार पडणार असून, निसर्गप्रेमींसाठी ही एक उत्तम पर्वणी ठरणार आहे. स्मारकाच्या तब्बल ३७ एकर विस्तीर्ण आणि निसर्गरम्य परिसरात नागरिकांना निसर्गाशी एकरूप होण्याची अनोखी संधी या निमित्ताने मिळणार आहे.
या दोन दिवसांच्या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना थेट चिखलात उतरून भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. यासोबतच पावसाळी जंगल सफर, नेचर ट्रेल, वृक्षारोपण, चिखलातील विविध खेळ, तसेच वाफाळत्या चहासोबत गाणी आणि कवितांची मैफल अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात रंगणाऱ्या या उत्सवात उपस्थितांना रानभाज्यांच्या पारंपरिक मेजवानीचाही आस्वाद घेता येणार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत निसर्गाच्या सान्निध्यात निवांत क्षण घालवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी डॉर्मिटरी निवासासाठी प्रति व्यक्ती ८०० रुपये, तर रूम शेअरिंगसाठी १२०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले असून रूम वाटपात ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या शिबिरासाठी जागा मर्यादित असल्याने प्रथम नोंदणी आणि शुल्क भरणार्यांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक निसर्गप्रेमींनी अधिक माहिती आणि सहभागासाठी आयोजकांशी ७७७६९३७८४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

