रत्नागिरी : जिल्ह्यातील लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे येथील सागर शिवाजी कळंबटे हा राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाला आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत त्याने हे यश मिळवले असून, आता तो राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धांमध्ये पंचाची महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
कालिका कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कबड्डीच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या सागरने सुरुवातीला अनेक स्पर्धांच्या आयोजनात सहभाग घेतला.
त्यानंतर २०१९ मध्ये त्याने जिल्हा पंच म्हणून परीक्षा दिली. जिल्हा पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावत त्याने आपला वेगळा ठसा उमटवला.
त्यानंतर मागे वळून न पाहता २०२२ मध्ये राज्यस्तरीय आणि आता २०२६ मध्ये राष्ट्रीय पंच परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याने रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
गेल्या सात वर्षांत त्याने अनेक तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. तसेच राज्य पंच म्हणून सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे झालेल्या चाचणी व इतर कबड्डी स्पर्धांमध्ये त्याने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे.
राष्ट्रीय पंच म्हणून देशासाठी उत्तम कामगिरी बजावत संपूर्ण देशात कोकणचे नाव उज्ज्वल करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे.
तसेच भविष्यात संधी मिळाल्यास आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण होऊन जगात कोकणचे नाव पोहोचवण्याची इच्छाही सागरने व्यक्त केली आहे.
त्याच्या या उत्तुंग यशामुळे राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धांमध्ये एका कोकणपुत्राला पंच म्हणून पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार असून, सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

