दापोली : शहरातून मौजे दापोलीकडे जाणारा रस्ता पहिल्याच पावसात पटेल स्वामी परिसरात पूर्णपणे चिखलमय झाला असून, या दुरवस्थेमुळे नागरिक आणि वाहनचालक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

पावसाळा सुरू होताच शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लाल माती आणि चिखल साचल्याने पादचारी आणि वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दररोज शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. मात्र, सततच्या पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, दुचाकी घसरून मोठे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

स्त्याच्या कडेला पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याने पाणी आणि माती थेट रस्त्यावर येत आहे. परिणामी, नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत, परंतु अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या रस्त्याची तातडीने साफसफाई करावी, तसेच डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करून पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पावसाळा अद्याप सुरूच असल्याने ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करू शकते, त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.