रत्नागिरी : जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील कोंड-कारूळ गावात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालक पोलिओमुक्त राहावे या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजले.
यावेळी त्यांनी सर्व पालकांना आपल्या पाल्यांच्या आरोग्यासाठी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत जिल्हाभरातील शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिओ लसीकरण बूथ उभारण्यात आले होते.
या केंद्रांवर बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. यावेळी प्रणव पोळेकर यांनी सांगितले की, पोलिओ हा बालकांमध्ये कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणारा गंभीर आजार असल्याने कोणतेही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक पालकाने जबाबदारी ओळखून पुढे आले पाहिजे.
तसेच त्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करत पोलिओमुक्त भारताचे स्वप्न कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गम भागातील तसेच बूथवर येऊ न शकलेल्या बालकांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरभेटी देऊन लसीकरण पूर्ण केले जाणार आहे.

ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. कोंड-कारूळ येथील या उपक्रमात आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या चिमुकल्यांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून या राष्ट्रीय मोहिमेला यशस्वी साथ दिली.

