खेड : तालुक्यातील खेड-दापोली मार्गावरील साखरोळी परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास एक मानवी हाडांचा सांगाडा आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून हा सांगाडा पुढील तपासासाठी ताब्यात घेतला असून, तो सध्या कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
प्राथमिक तपासानुसार, सापडलेला सांगाडा नेमका पुरुषाचा आहे की महिलेचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, तसेच या व्यक्तीची ओळखही पटू शकलेली नाही.
या गूढ प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी खेड पोलीस आता विविध अंगांनी सखोल तपास करत आहेत. याप्रकरणी शववैद्यकीय आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि अधिक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

