दापोली : राज्यभरातील शाळा १५ जूनपासून पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील काळकाई कोंड येथील लोकमान्य हायस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे कार्याध्यक्ष धनंजय खोत, माजी नगराध्यक्षा विनिता शिगवण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप कदम आणि ज्येष्ठ नागरिक प्रभाकर चोरगे यांच्या हस्ते नवोदित विद्यार्थी व पालकांना पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

मुख्याध्यापिका काजल राऊत यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यावेळी सर्वांचे स्वागत केले. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रभात फेरी, लेझीम नृत्य, ‘शाळेतील माझे पहिले पाऊल’, तसेच विद्यार्थी आणि शिक्षक परिचय असे विविध उपक्रम राबवण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

शिस्त, गुणवत्ता व सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यंदाच्या वर्षात मोठे यश संपादन करावे, असा संदेश यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिला. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

