रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतील आरोग्य विभागातील सफाई कामगारांच्या वेतनाच्या प्रश्नावर पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेचे सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार जैन तसेच कायद्याने वागा लोकचळवळ आणि लेबर राईट्सच्या जिल्हा प्रतिनिधींनी स्वागत केले आहे.

सर्व विभागांतील कंत्राटी कामगारांना कामगार आयुक्तांनी निश्चित केलेले किमान वेतन, भविष्यनिर्वाह निधी (पीएफ), आरोग्य विमा (ईएसआयसी), वार्षिक बोनस आणि इतर भत्ते मिळावेत, यासाठी जानेवारी २०२४ पासून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.

गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पगार फरकाच्या मागणीसाठी नगर परिषदेकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. रत्नागिरी नगर परिषद ही ‘वर्ग ब’ आणि परिमंडळ १ मध्ये येत असल्याने कायद्यानुसार आरोग्य विभागातील सफाई कामगारांना आवश्यक सुविधा आणि वेतन मिळणे अपेक्षित आहे.

मार्च २०२६ दरम्यान सुमारे शंभर ते दीडशे कंत्राटी सफाई कामगारांनी किमान वेतन आणि इतर लाभांच्या मागणीसाठी कायद्याने वागा लोकचळवळीच्या लेबर राईट्समार्फत नगर परिषद प्रशासनाकडे तक्रार अर्ज दाखल केले होते.

त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. किमान मागील दोन वर्षांचा पगार फरक तात्काळ देण्यात यावा आणि सफाई कामगारांच्या कंत्राटी प्रक्रियेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जैन यांनी केली आहे.

या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उदय सामंत यांच्या सध्याच्या सकारात्मक भूमिकेमुळे कामगार आयुक्तांनी निश्चित केलेल्या कायद्यानुसार सफाई कामगारांना किमान २० हजार रुपये वेतन, पाच हजार रुपयांचा पीएफ, आरोग्य विमा, इतर भत्ते आणि बोनस मिळेल, असा विश्वास विजयकुमार जैन यांनी व्यक्त केला आहे.