दापोली: तालुक्यातील साखळोली क्रमांक १ जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या मुंबईस्थित मंडळातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे आणि विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यासोबतच शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी पंचवीस हजार रुपयांची आर्थिक देणगीही देण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच हे साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
वाढती गरज आणि आधुनिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून प्रकाश काष्टे यांनी शाळेच्या शैक्षणिक आणि कार्यालयीन वापरासाठी प्रिंटर भेट दिला. चंद्रकांत देवघरकर यांनी पृथ्वीगोल, नोटपॅड यांसारखी महत्त्वपूर्ण शैक्षणिक साधने शाळा व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केली, तर सदानंद नवरत यांनी शालेय विकास निधीत पाच हजार रुपयांचे योगदान दिले.

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळेचे ऋण फेडण्यासाठी मुंबईस्थित ग्रामस्थ मंडळ कायम तत्पर राहील, अशी ग्वाही समन्वयक रमेश नवरत यांनी दिली. त्यांनी आपले दिवंगत वडील बाळकृष्ण नवरत यांच्या स्मरणार्थ शाळेला दहा हजार रुपये किमतीचा पोडियमही प्रदान केला.
याप्रसंगी मनोज जाधव यांनी शाळा इमारतीच्या बांधकामाचा आणि त्यासाठी विविध स्तरांवरून मिळालेल्या सहकार्याचा आढावा घेतला. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैभवी गोरीवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘देणाऱ्याचे हात घ्यावे’ या उक्तीचा संदर्भ दिला.
विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर कार्यरत व्हावे आणि समाजाप्रती दानत व कृतज्ञतेची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. मंडळाचे सचिव विजय भुवड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात शाळेसाठी अविरत परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले.

मराठी शाळा नेहमीच गुणवंत आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडवतात, त्यामुळे आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात सुनील जाधव, सदानंद नवरत आणि मनोज जाधव यांनीही आपले विचार मांडले. विद्यार्थिनी शुभ्रा घडवले आणि आद्या गोरीवले यांनी शैक्षणिक वस्तूंच्या वाटपाबद्दल विद्यार्थ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक समीर ठसाळ यांनी केले असून यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते.

