रत्नागिरी : तालुक्यातील गोळप व फणसोप परिसरातील सहा अंगणवाड्यांचे नूतनीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, त्याचे उद्घाटन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

फिनोलेक्स कंपनीला ४५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित, प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चांगले वातावरण मिळावे, या उद्देशाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाऊंडेशनने हा पुढाकार घेतला.

मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या दूरदृष्टीतून आणि संकल्पनेतून हा प्रकल्प यशस्वीरीत्या साकारण्यात आला आहे.

बालविकासाची पायाभरणी अंगणवाडीतूनच होत असल्याची जाणीव ठेवून या प्रकल्पांतर्गत गोळप गावातील रनपार, गुरववाडी, गोळप सडा, शिरंबाडवाडी तसेच फणसोप गावातील फणसोप मराठी आणि मागलाड या अंगणवाड्यांना नवसंजीवनी देण्यात आली आहे.

या नूतनीकरण प्रक्रियेमध्ये इमारतींची दुरुस्ती, बोलक्या भिंती, रंगकाम, स्वच्छतागृह सुविधा तसेच बालकांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक परिसर तसेच बालमैत्रीपूर्ण वातावरणामुळे येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

रितू प्रकाश छाब्रिया यांच्या नेतृत्वाखाली फाऊंडेशनतर्फे शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे स्थानिक समुदायाकडून विशेष स्वागत करण्यात आले आहे.

गोळप येथील अंगणवाड्यांच्या उद्घाटन कार्यक्रमास रत्नागिरीतील वकील व फाऊंडेशनच्या सल्लागार रुची महाजनी, गौरव महाजनी, सरपंच प्रियांका पंकज सुर्वे, उपसरपंच संदीप तोडणकर, माजी सरपंच उमंग साळवी तसेच कंत्राटदार सुयोग आंबेरकर आणि ओंकार भेकरे उपस्थित होते.

फणसोप येथील कार्यक्रमास युवा सेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी, पंचायत समिती सदस्या अर्चना साळवी, सरपंच राधिका साळवी, माजी सरपंच गिरीराज साळवी, फणसोप विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मनोज साळवी, ग्रामपंचायत सदस्य राकेश साळवी व मिलिंद कांबळे उपस्थित होते.

याशिवाय फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे टेक्निकल डायरेक्टर रामबाबू सांका, फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, प्लांट एचआर हेड नंदकिशोर शिंपी, सिव्हिल हेड अमित घोरपडे, विकास कुरतडकर, आशिष आठवले आणि मुकुल माधव फाऊंडेशनचे शुभम भेगडे, शामराव निंबाळकर, वरद गोरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी रितू प्रकाश छाब्रिया यांच्या समाजाभिमुख दृष्टिकोनाचे आणि ग्रामीण भागातील बालविकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक ग्रामपंचायत, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले.