दापोली : मुंबई येथून नियमित प्रसिद्ध होणाऱ्या ‘कोकणदीप’ मासिकाच्या २४ व्या वर्धापनदिन समारंभात कोकणातील प्रथितयश साहित्यिक आणि उपक्रमशील शिक्षक बाबू घाडीगांवकर यांना मानाच्या ‘कोकणभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्यांच्या या यशाबद्दल साहित्यिक आणि शैक्षणिक वर्तुळातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे. कोकणदीप हे मासिक गेल्या २४ वर्षांपासून नियमित प्रकाशित होत असून दिलीप शेडगे हे या मासिकाचे संपादक आहेत.
मासिकाच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त कोकण तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, पत्रकारिता, संघटन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ व्यक्तींना ‘कोकणभूषण’ तर अद्वितीय कार्य करणाऱ्यांना ‘कोकणदीप जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
साहित्य, शिक्षण आणि संघटन क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल बाबू घाडीगांवकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मुंबईत दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कोकणदीपचे संपादक दिलीप शेडगे, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, शिवसेना दापोली तालुका संपर्क प्रमुख सुधीर कदम, ज्येष्ठ कामगार नेते प्रवीण घाग, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी शेडगे, ज्येष्ठ उद्योजक प्रवीण लाड, रणजित जाधव आदी उपस्थित होते.
सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोकणदीप मासिकाचा हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘कोकणभूषण’ पुरस्कार प्राप्त झाल्याने दापोलीसह संपूर्ण कोकणातून बाबू घाडीगांवकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

