रत्नागिरी : जिल्ह्यातील फणसोप-कसोप परिसरातील गरजू शेतकऱ्यांना फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च दर्जाच्या भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होत असून शेती उत्पादन वाढण्यास मदत होत आहे.

या उपक्रमांतर्गत कसोप, फणसोप, कुर्ली, वायंगणी आणि मागलाड या पाच गावांतील शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

फणसोप सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि फणसोप ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या विनंतीनुसार हा उपक्रम राबविण्यात आला. या बियाण्यांच्या मदतीने ५० एकरांहून अधिक क्षेत्र लागवडीखाली येणार असून यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे.

गेल्या ४५ वर्षांपासून फिनोलेक्स इंडस्ट्रीज देशभरात महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण, बालकांचे शिक्षण आणि समाजातील विविध घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे.

फणसोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या संजना साळवी, सोसायटीचे प्रतिनिधी मनोज साळवी, राजेंद्र साळवी, समीर साळवी, तुषार साळवी, माजी सरपंच गिरिराज साळवी तसेच दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे डायरेक्टर टेक्निकल रामबाबू संका, फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, सिनिअर लायझनिंग ऑफिसर आशिष आठवले आणि सीएसआर ऑफिसर शामराव निंबाळकर उपस्थित होते.

संस्थेकडून मोगरा व भाजी लागवडीसह विविध शेतीविषयक प्रशिक्षण दिले जात असल्याने शेतकरी, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचे आभार मानले.

मुकुल माधव फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या संचालिका रितू छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील शेतकरी व गरजू कुटुंबांच्या विकासासाठी सातत्याने उपक्रम राबविले जात आहेत.

या समाजोपयोगी उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढण्यासोबतच ग्रामीण भागातील शाश्वत विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.