संगमेश्वर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाकरे सेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख आणि कुणबी समाजाचे नेते सहदेव बेटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते येत्या बुधवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोकणच्या राजकीय वर्तुळात बेटकर यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते, ज्यावर आता शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्यापूर्वीच बेटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केला असून, बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ते अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

सहदेव बेटकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजाचे अत्यंत प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कुणबी समाज आणि एकूणच ओबीसी घटकांवर त्यांची चांगली पकड असल्याने त्यांच्या या निर्णयाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

रत्नागिरी हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा संपर्क प्रमुखानेच पक्षाची साथ सोडल्याने संघटनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

या घडामोडीमुळे भाजपला कोकणात मोठे राजकीय बळ मिळणार असून, बेटकर यांच्या भाजप प्रवेशानंतर ठाकरे सेना यावर काय भूमिका घेणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.