नगराध्यक्ष कृपा घाग यांची उपस्थिती
दापोली : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी दापोलीतील नॅशनल हायस्कूलमध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
शाळेच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांच्या हातात विविध रंगांचे फुगे देण्यात आले. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत वाजतगाजत त्यांना वर्गात नेण्यात आले.

या स्वागत समारंभाला दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, युवासेनेचे स्वरूप महाजन, केंद्रप्रमुख जुईकर, मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार, कॉलेज कमिटीचे अध्यक्ष आरिफ मेमन, सदस्य नाझीम काझी, हमीद बांगी, मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांच्यासह बहुसंख्य पालक उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले. शाळेच्या कमानी, वर्ग आणि फलकांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
जिल्हा परिषद सदस्य आणि माजी पंचायत समिती सभापती किशोर देसाई यांनीही या वेळेला सर्वांना शुभेच्छा दिल्या.

इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्यात आली. प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळेत मित्रांसोबत भेटल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा कृपा घाग यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत चांगला अभ्यास करून शाळा आणि पालकांचे नाव उज्ज्वल करण्याचा सल्ला दिला.
मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या वाढत्या गुणवत्तेची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका फैरोजा सावंत यांनी शाळेतील सोयी-सुविधा आणि पुढील नियोजनाची माहिती पालकांना देऊन त्यांची मते जाणून घेतली.

या कार्यक्रमाला हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान मोमीन यांनी केले, तर आभार फैरोजा सावंत यांनी मानले.

