मुंबई : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा २०२६ च्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे सदस्य संग्राम देसाई यांनी प्रचंड मताधिक्य मिळवून विजय संपादन केला आहे.

या निवडणुकीतील एकूण २५ विजयी सदस्यांपैकी थेट सहाव्या क्रमांकाची मते मिळवून निवडून येण्याची कामगिरी देसाई यांनी केली असून, सिंधुदुर्गसारख्या छोट्या बारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराचा हा विजय संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी अभिमानास्पद मानला जात आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण तसेच ज्येष्ठ वकील वर्गाकडून या विजयाचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. खंडपीठ निर्मिती, विविध न्यायालयांची स्थापना, अ‍ॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची उभारणी आणि वकील वर्गाच्या कल्याणासाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय यांमुळे देसाई हे वकील वर्तुळात अत्यंत लोकप्रिय आहेत.

त्यांच्या याच कामाची पोचपावती म्हणून ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सलग दुसऱ्यांदा या कौन्सिलवर निवडून आले आहेत. या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अनेक मातब्बर उमेदवारांना मागे टाकत, त्यांनी पहिल्याच फेरीत आवश्यक कोटा पूर्ण केला आणि सहाव्या क्रमांकावर झेप घेतली.

महाराष्ट्र, गोवा, तसेच दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील विविध जिल्हा आणि तालुका पातळीवरील वकिलांच्या विकासासाठी केलेल्या कामांमुळेच त्यांना ही व्यापक पसंती मिळाली आहे.

या ऐतिहासिक विजयानंतर प्रतिक्रिया देताना संग्राम देसाई यांनी सांगितले की, या यशात प्रत्येक वकील बांधवाने त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाचा मोठा वाटा आहे आणि भविष्यातही ते वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अविरत कार्यरत राहतील.

देसाई यांच्या या यशामुळे आता खऱ्या अर्थाने वकिलांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारा हक्काचा माणूस कौन्सिलवर पोहोचल्याची भावना वकील वर्गाने व्यक्त केली आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर एफ. एम. डिंगणकर, बाबासाहेब परुळेकर, डी. बी. भावे, मुद्दस्सर डिंगणकर, अशोक भिसे, बंटी वणजू, महेंद्र मांडवकर, संबंधित महिला वकील, नीलम शेवडे यांनी देसाई यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध जिल्हा व तालुका वकील संघटनांकडून सध्या देसाई यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.