रत्नागिरी : जिल्ह्यातील लांजा येथील कोत्रेवाडी परिसरातील झिमण्स कश्यु पॉईंट या काजू फॅक्टरीमध्ये झालेली मोठी चोरी उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ९,४१,८७९ रुपये किमतीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन हस्तगत केले आहे.
२८ मे २०२६ च्या संध्याकाळी ६:०० ते २९ मे २०२६ च्या सकाळी ९:२० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी या काजू फॅक्टरीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता आणि फॅक्टरीमधील काजू गर चोरून नेला होता.
या संदर्भात लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा रजि. नं. ११२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळावर कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्रे फिरवली.
या तपासादरम्यान पोलिसांनी भाटये नवानगर, रत्नागिरी येथील रहिवासी शाहरुख मुराद साखरकर (वय ३०) आणि मूळचा बांद्रा पश्चिम, मुंबई येथील रहिवासी असलेला व सध्या भाटये, रत्नागिरी येथे राहणारा वजीद मोहम्मद अझीझ खान (वय ४१) या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
या यशस्वी कारवाईनंतर पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल आणि चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त केले आहे.
ही संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, सुभाष भागणे, विजय आंबेकर, अमित कदम, दिपराज पाटील आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास लांजा पोलीस ठाणे करत आहे.

