दापोली : युवकांचे व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व प्रशिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने जेसीआय दापोली आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या करारामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक नवे पर्व सुरू झाले आहे. या भागीदारीअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, नेतृत्व प्रशिक्षण, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) उपक्रम, युवक सक्षमीकरण, समाजसेवा प्रकल्प, विविध सामाजिक विकास उपक्रम तसेच परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे. या महत्त्वपूर्ण कराराप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, विनायक जालगावकर आदी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी विद्यापीठ प्रशासन आणि प्राध्यापकवर्गाने दिलेल्या सहकार्याबद्दल जेसीआय दापोलीतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष कुणाल मेहता, सचिव रोशन वेदक, खजिनदार ऋषिकेश शेठ, भूषण इसवलकर, अभिषेक खटावकर, तेजस मेहता, मयुरेश शेठ, स्वप्नील मेहता, ओंकार कर्वे, ऋषी तलाठी आणि अनिकेत खानविलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्ञान, नेतृत्व आणि सेवाभावाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही भागीदारी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देत त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केला.

‘समुदाय विकासासाठी नेतृत्व’ या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन जेसीआय दापोली आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आगामी काळात समाजहितासाठी विविध उपक्रम संयुक्तपणे राबविणार आहेत.