गुहागर: गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील शिवकालीन ‘गोपाळगड’ किल्ला महाराष्ट्र राज्य पुरातत्व व महसूल विभागाने शासनाच्या नावे करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

गोपाळगड किल्ल्याच्या सातबारा उताऱ्यावर काही तांत्रिक चुकांमुळे स्थानिक रहिवाशांची नावे दाखल झाली आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक किल्ला क्षेत्रात स्थानिकांची वहिवाट आणि आंबा बागायती आहेत.

ही खाजगी मालकी हटवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक वृत्तपत्रे गेली अनेक वर्षे शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करत आहेत.

याबाबतच्या बहुतांश कायदेशीर बाबी आता पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पुरातत्व विभाग आणि महसूल विभाग यांच्याकडून अंतिम टप्प्यातील कार्यवाही करून प्रत्यक्षात किल्ला शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.

या प्रलंबित प्रक्रियेकडे लक्ष वेधत, उदय सामंत यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष द्यावे आणि गोपाळगड किल्ला पुरातत्व व महसूल विभागाच्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रणव पोळेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य संरक्षित स्मारक असलेली गोपाळगडाची ही वास्तू खाजगी मालकी आणि वहिवाटीतून लवकरात लवकर मुक्त करावी, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.