दापोली: तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पर्यटन व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

या समस्येविरोधात दापोली पर्यटन विकास मंचाने महावितरण कंपनीवर रोष व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

मंचाच्या वतीने महावितरणच्या दापोली येथील उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले असून, सततच्या वीजकपातीमुळे पर्यटन व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सध्या मे महिन्याचा पर्यटन हंगाम सुरू असताना वीजपुरवठा खंडित होत असल्याने हॉटेल, रिसॉर्ट आणि लॉजिंग व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

निवेदनामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमांचा दाखला देत, ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित राहण्याच्या मर्यादांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अनेक भागांमध्ये लो व्होल्टेज, ट्रिपिंग आणि अचानक वीज जाण्याच्या समस्येमुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरत असून दापोलीच्या पर्यटन प्रतिमेलाही फटका बसत आहे.

यावर उपाय म्हणून दापोली पर्यटन पट्ट्यासाठी स्वतंत्र डेडिकेटेड एक्सप्रेस फीडर सुरू करणे, वीज खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्ती करणे, ग्राहकांना नुकसानभरपाई देणे आणि दोष तातडीने दूर करणे अशा मागण्या व्यावसायिकांनी प्रशासनाकडे केल्या आहेत.

दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सर्व व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

योग्य कार्यवाही न झाल्यास दापोली महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला असून या संभाव्य आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.