रत्नागिरी : शहरालगतच्या कुवारबाव येथील साईनगर भागात असलेल्या सात बंगल्यांच्या पाठीमागे अज्ञात कारणातून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याची निघृण हत्या करण्यात आली आहे.

सूरज राजाराम झोरे (वय २५, मूळ रा. नायरी-संगमेश्वर, सध्या रा. विरार-मुंबई) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी परिसरात मोठी खळबळ उडाली असून रत्नागिरी शहर पोलिसांनी तत्परता दाखवत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

गुरुवार २१ मे रोजी रात्री साडेनऊ ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही रक्ताळलेली घटना घडली.

मूळचा संगमेश्वर तालुक्यातील असलेला सूरज काही कामानिमित्त रत्नागिरीत आला होता. रात्री तो कुवारबाव परिसरातील सात बंगल्यांच्या पाठीमागे असताना संशयितांनी त्याला गाठले आणि त्याच्या मानेवर व हातांवर धारदार कोयत्याने जीवघेणे वार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सूरजला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

मात्र, शुक्रवार २२ मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मृत सूरजच्या बहिणीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तातडीने कारवाई केली आणि सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड आणि नजीबूल शेख उर्फ सोनू या तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

हा भीषण हल्ला कोणत्या आर्थिक, वैयक्तिक की पूर्ववैमनस्यातून झाला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे या प्रकरणाचा सखोल तपास करत असून संशयितांच्या चौकशीनंतर हत्येचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.