रत्नागिरी : सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आणि मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयात आणखी एक यशस्वी आणि जीव वाचवणारी शस्त्रक्रिया पार पडली आहे. एका ७० वर्षीय महिलेच्या बिजाशयातून तब्बल ११ किलो वजनाची गाठ बाहेर काढून तिला जीवनदान देण्यात आले. संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या आरोग्यसेवेच्या कार्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळत असून, याचा प्रत्यय पुन्हा या रुग्णालयात आला.

पाडावेवाडी, मिरजोळे (ता. जि. रत्नागिरी) येथील ही ७० वर्षीय महिला उलटी होणे, तीव्र पोटदुखी तसेच सतत अशक्तपणा जाणवणे या त्रासांमुळे भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागात दाखल झाली होती.

या महिलेची सखोल वैद्यकीय तपासणी आदेश पाल्येकर यांनी केली असता तिच्या बीजाशयामध्ये मोठ्या आकाराची गाठ असल्याचे निदान झाले.

त्यानंतर तातडीने रक्त तपासणी, सोनोग्राफी तसेच इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. वैद्यकीय अहवालांचा अभ्यास करून पुढील उपचारासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्जन आदेश पाल्येकर आणि भूलतज्ज्ञ जमशीर यांच्या उपस्थितीत ही अत्यंत गुंतागुंतीची व आव्हानात्मक शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात वैद्यकीय पथकाला यश आले.

रुग्णाच्या शरीरातील तब्बल ११ किलो वजनाची गाठ सुरक्षितपणे काढण्यात आली. नर्सिंग स्टाफ आणि सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय पथक व संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

हे रुग्णालय १ जून २०२५ रोजी सुरू झाले असून मागील एक वर्षात या रुग्णालयात ५० हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी मोफत औषधोपचार घेतले आहेत. आतापर्यंत ३४०० पेक्षा जास्त रुग्ण या रुग्णालयातून मोफत उपचार घेऊन बरे झाले आहेत, तर १२०० पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

तसेच रुग्णालयाच्या ९ रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांत सेवा देत असून रुग्णालयाच्या माध्यमातून दर महिन्याला २२ आरोग्य शिबिरांचे आयोजन जिल्ह्यात विविध ठिकाणी मोफत केले जाते.

ग्रामीण व गरजू रुग्णांना अत्याधुनिक आणि मोफत आरोग्यसेवा देण्याचा संकल्प जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सातत्याने पूर्ण करत असून निलेश सांबरे यांच्या सामाजिक बांधिलकीतून सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.